Mumbai News : एअरबॅगमुळे वाशीमध्ये 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई : अपघाताच्या वेळी गाडीतील एअर बॅग प्रवाशांसाठी वरदान ठरते, असे म्हटले जाते, मात्र या एअर बॅगमुळे वाशीतील एका 6 वर्षाच्या चिमुरड्याचा जीव गेला. हर्ष मावजी आरोठिया असे मृत मुलाचे नाव आहे. नवी मुंबईतील वाशी परिसरात हा भीषण अपघात झाला. अपघातादरम्यान कारची एअर बॅग उघडल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला.
समोरील एसयूव्ही रोड डिव्हायडरला धडकली. त्या गाडीचा मागचा भाग हर्ष बसलेल्या गाडीच्या बोनेटवर पडला आणि एअर बॅग अचानक उघडली. या अपघातानंतर पोलिसांनी एसयूव्हीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
हर्षचे वडील मावजी आरोठिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष आणि त्याची भावंड पाणीपुरी खाण्याचा हट्ट करत होती. सर्वजण पाणीपुरी खायला गाडीत बसले. मावजी गाडी चालवत होते, हर्ष त्यांच्या शेजारी बसला होता आणि बाकीचे लोक मागील सीटवर बसले होते. रात्री 11.30 च्या सुमारास ते वाशीतील सेक्टर-28 मधील ब्लू डायमंड हॉटेल जंक्शनजवळ होते.
त्यांच्या कारसमोर एक एसयूव्ही होती. काही वेळातच, एसयूव्ही वेगाने पुढे गेली आणि दुभाजकावर आदळली आणि तिचा मागचा भाग हवेत उडून आरोठिया यांच्या कारच्या बोनेटला धडकला. त्या धक्क्याने कारची एअर बॅग उघडली आणि हर्ष गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पॉलीट्रॉमा शॉकमुळे झाला मृत्यू
हर्षच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. पॉलीट्रॉमा शॉकमुळे हर्षचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पॉलीट्रॉमा म्हणजे शरीरात एकापेक्षा जास्त ठिकाणी झालेली जखम. अंतर्गत जखमांमुळे रक्तस्त्राव होऊन हर्षचा मृत्यू झाला. या अपघातात मावजी आणि हर्षच्या भावंडांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.





