Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप आणि शिवेसना शिंदे पक्षाने मुंबईत महायुती केली असून, जागावाटपाचा फॅार्म्युला ठरला आहे. ज्या २० जागांवर तिढा निर्माण झाला होता. हा तिढा सोडविण्यात महायुतीला यश आले आहे. मुंबई महापालिकेसाठी १३७ जागा भाजप लढवणार असून, ९० जागा शिवसेना शिंदे यांच्या पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची नावे जाहीर न करता थेट एबी फॅार्मचे वाटप केले जात आहे. अनेकांना उमेदवारी मिळाली नसल्याने मोठी नाराजी पसरली आहे. शिवसेनेतील निष्ठावान समजलेल्या जाणाऱ्या शिलेदाराने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना विभाग क्रमांक २ चे विभागप्रमुख लाल सिंह राजपुरोहित यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला असून त्यांची पत्नी भाग्यलक्ष्मी यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेसाठी एक एक जागा महत्वाची असून त्यानुसार रणनिती आखली जात आहे. शिवसेनेला ९० जागा मुंबई महापालिकेसाठी मिळाल्या असून, इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काहींच्या पदरी हसू तरी काहींच्या पदरी आसू अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. काँग्रेसने या महापालिका निवडणुकीत महायुतीला पर्यायाने शिवसेनेला पहिला चेकमेट दिला आहे. राज पुरोहित काँग्रेससोबत गेल्याने प्रभागातील समीकरणे बदलणार आहे. याचा फटका निवडणुकीत शिवसेनेला बसणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या पार्श्वभूमीवर असे लक्षात येते की शिवसेनेला नाराजांची मनधरणी करावी लागणार आहे. अन्यथा अशा प्रकारची बंडखोरी करण्याच्या तयारीत अनेकजण असू शकतात, हे मोठे आव्हान शिवसेनेपुढे उभे ठाकले आहे. तिढा सुटला मुंबईत भाजप आणि शिवसेनेची महायुती होणार हे निश्चित मानले जात होते. अखेर तसेच झाले आहे. पण दोन्ही पक्षांकडून जागावाटपात मोठी रस्सीखेच झाली. २० जागांवर निर्णय अंतिम होत नव्हता. या जागांचा तिढा अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही पक्षांकडून ताणण्यात आला. अखेर काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी याचा तिढा सोडविण्यात यश आले आहे. हेही वाचा : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी; कोणाला मिळाली संधी?