मुंबईचे IPS सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन; देवदर्शनाला जाताना कारला ट्रकची धडक

मुंबई: मुंबई पोलिस दलातील 2011 बॅचचे IPS अधिकारी डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरनूलकडे देवदर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र पोलिस दलात शोक पसरला आहे.
कोण होते सुधाकर पठारे?
सुधाकर पठारे हे अहमदनगर जिल्ह्यातील वाळवणे (ता. पारनेर) येथील रहिवासी होते. त्यांनी एम.एस्सी. (कृषी) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षांद्वारे 1995 मध्ये जिल्हा विशेष लेखा परीक्षक, 1996 मध्ये विक्रीकर अधिकारी, तर 1998 मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून करिअर सुरू केले.
त्यांनी पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर, राजुरा येथे पोलिस उपअधीक्षक, तर चंद्रपूर, वसई येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. CID अमरावतीचे पोलिस अधीक्षक आणि मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून त्यांनी सेवा बजावली.
पठारे यांनी संघटित गुन्हेगारीविरुद्ध मोक्का, तडीपारी, MPDA अंतर्गत कठोर कारवाया केल्या आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या निधनाने पोलिस खात्यातील एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.





