Mumbai Indians : मुंबई इंडियन्स इतिहासाची पुनरावृत्ती करणार कि इतिहास घडवणार? जाणून घ्या इलिमिनेटर सामन्यातील कामगिरी

पंजाब किंग्जने सोमवारी पार पडलेल्या सामन्यात मुंबईचा पराभव करून टॉप – 2 मध्ये आपले स्थान पक्के केले. त्यामुळे आता पंजाब किंग्ज पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे. हे स्पष्ट झालं तर मुंबईला इलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. मात्र या सामन्यात मुंबईचा प्रतिस्पर्धी कोणता संघ असणार हे आज होणाऱ्या लखनऊ आणि बंगळुरुच्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मुंबईची इलिमिनेटर सामन्यातील कामगिरी…
मुंबई इंडियन्स इतिहासाची पुनरावृत्ती करणार कि इतिहास घडवणार?
मुंबई पहिल्यांदा 2010 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचली होती, परंतु चेन्नई सुपर किंग्ज कडून त्यांचा पराभव झाला होता.याशिवाय, मुंबई 2011, 2012, 2014 आणि 2023 मध्ये देखील प्लेऑफमध्ये पोहोचली होती, परंतु या हंगामात तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे त्यांना एलिमिनेटर सामना खेळावा लागला. या चारही वेळा, मुंबई कधीही अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही.
यावर्षी पंजाब किंग्जविरुद्ध पराभवामुळे आता मुंबईला प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामना खेळावा लागेल हे स्पष्ट झाले आहे.मुंबई इंडियन्सने यापूर्वी चार वेळा एलिमिनेटर सामने खेळले आहे,परंतु त्यांना या चारही सामन्यानंतर अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली हा संघ यावेळी इतिहास बदलू शकेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एलिमिनेटरमध्ये मुंबईची कामगिरी
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चार वेळा एलिमिनेटर सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत.
2011: मुंबईने एलिमिनेटर जिंकला पण क्वालिफायर 2 मध्ये पराभव पत्करला.
2012: मुंबई एलिमिनेटरमध्ये पराभूत झाली.
2014: मुंबई पुन्हा एलिमिनेटरमध्ये पराभूत झाली.
2023: मुंबईने एलिमिनेटर जिंकला पण क्वालिफायर 2 मध्ये पराभव पत्करावा लागला.
एलिमिनेटर सामना कुठे रंगणार?
या हंगामातील एलिमिनेटर सामना 30 मे 2025 रोजी मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईचा प्रतिस्पर्धी कोणता संघ असणार हे आज होणाऱ्या लखनऊ आणि बंगळुरुच्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे.
मुंबई इंडियन्स 10 व्यांदा प्ले ऑफमध्ये
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, संघाने पाच वेळा (2013, 2015,2017,2019 आणि 2020) आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मुंबईने एकूण 10 वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे, त्यापैकी पाच वेळा टॉप-2 मध्ये राहून विजेतेपद जिंकले आहे.





