क्रिकेट कॉर्नर : बुम बुम बुमराह

-अमित डोंगरे
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने यंदाच्याही आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक बळी घेत आपणच बॉस असल्याचे सिद्ध केले. खरेतर त्याने गेल्या तीन मोसमांपासून आपल्या गोलंदाजीसमोर भल्या भल्या फलंदाजांना नाचवले आहे. त्याचा संभ्रमात टाकणारा वेग, दीशा, टप्पा आणि सर्वात महत्त्वाचा टो-ब्रेकर यॉर्कर सगळेच काही स्वप्नवत आहे.
त्याचा रनअप पाहिला किंवा त्याची गोलंदाजीची शैली पाहिली किंवा त्याचा अगेन्स्ट द बॉडी रिलीज पाहिला की पहिल्यांदा हा वेगवान गोलंदाज असा कसा हाच प्रश्न पडतो. मात्र, त्याचे भन्नाट वेगाचे यॉर्कर पाहिले की सुलतान ऑफ स्विंग वासीम अक्रमची भारतीय आवृत्ती स्पष्ट जाणवते. बुमराह जेव्हा भारतीय संघात पहिल्यांदा आला तेव्हा त्याची गोलंदाजीची शैली पाहून अनेकांनी तो फारसा यशस्वी होणार नाही असे म्हटले होते. मात्र, त्याने त्यांचेच दात घशात घालत आपली कामगिरी सिद्ध केली.
त्याला आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतले व लसित मलिंगाला संघातच स्पर्धा मिळाली. अर्थात मलिंगाकडूनच बुमराहने यॉर्करचे बाळकडू घेतले व आज जागतिक क्रिकेटमध्ये सातत्याने असे चेंडू टाकण्याची हुकूमतही त्याने सिद्ध केली. आयपीएल स्पर्धेतही त्याच्या बाबतीत एक अनोखा योगायोग जुळून आला. त्याने यंदाच्या स्पर्धेत विराट कोहलीला बाद करत आपला आयपीएल स्पर्धेतील 100 वा बळी नोंदवला. योगायोग असा की त्याने स्पर्धेतील पहिला बळी देखील कोहलीला बाद करत नोंदवला होता. 2013 साली बुमराहने स्पर्धेत पहिला बळी मिळवताना कोहलीला बाद केले होते. बुमराहने जेव्हा 100 व्या बळीची नोंद कोहलीला बाद करत केली तेव्हा ही कामगिरी कोहलीलाही माहीत होती आणि म्हणूनच बाद झाल्यावर ड्रेसिंग रूमकडे परतत असताना कोहलीने त्याच्याशी हस्तांदोलन केले व त्याचे अभिनंदनही केले.
बुमराहने गेल्या सातही वर्षात मुंबई इंडियन्सकडून अत्यंत भरीव कामगिरी केली आहे. यंदाच्या स्पर्धेत वैयक्तिक कारणाने मलिंगाने माघार घेतली होती, पण बुमराहने त्याची उणीव भरून काढत आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केला यात शंका नाही. मुंबईने यंदाच्या स्पर्धेत आजवर जे यश मिळवले आहे त्यात सर्वात मोठा वाटा बुमराहचाच आहे.
आज बुमराह केवळ 26 वर्षांचा असून त्याची कारकीर्द आणखी मोठी होणार आहे. त्याची गोलंदाजी पाहिल्यावर खुद्द स्विंगचा बादशहा वासीम अक्रमनेही स्तुती केली होती. अनेक वर्षांनंतर बुमराहच्या रूपाने सातत्याने यॉर्कर चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज पाहायला मिळाला असे अक्रमने म्हटले होते. यापेक्षा मोठे प्रशस्तीपत्रक काय असू शकते.
आतापर्यंत बुमराहने आयपीएलच्या सामन्यांचे शतक पूर्ण केले नसले तरी स्पर्धेत बळींचे शतक मात्र पूर्ण केले आहे. त्याची आयपीएलमधील बळी घेण्याची सरासरी 24 च्या आसपास आहे. ही सरासरी टी-20 क्रिकेटमध्ये अत्यंत चांगली समजली जाते. त्याच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य असे की, हा भारताचा पहिलाच गोलंदाज आहे की, जो सातत्याने 140-145 किलोमीटर वेगाने चेंडू टाकू शकतो. त्याच्या शरीरयष्टीकडे तसेच त्याच्या शैलीकडे पाहिले तर हे सर्व आचंबित करणारे आहे.
डेथ ओव्हर्सचा बादशहा असेच त्याला संबोधले जाते. सामना एकदिवसीय असो किंवा टी-20 अखेरच्या षटकांत समोरच्या फलंदाजाला जखडून टाकण्यात त्याची हुकूमत त्याने सातत्याने दाखवून दिली आहे. आयपीएल स्पर्धेतही तोच मुंबईचा तारणहार बनल्याचे अनेक सामन्यांतून पाहिले आहे. आता येत्या काळात तो नवनवे विक्रम रचताना महान गोलंदाज कपिल देव यांच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचा आणखी एक यशस्वी गोलंदाज म्हणून नावारूपाला येईल याचा विश्वास वाटतो.





