मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचे सुपुत्र गणेश हंडोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री एका दुचाकीस्वराला कारने उडवून पळून गेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गोवंडी पोलिसांकडून गणेश हंडोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? गणेश हंडोरे हे ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेलेले होते. परत येताना चेंबूरमधल्या आचार्य महाविद्यालयाजवळ त्यांनी आपल्या कारने गोपाल आरोटे नावाच्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात गोपाल आरोटे मोठ्या प्रमाणात जखमी झाला. मात्र गणेश हंडोरे यांनी गोपाल यांना तशा अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पळ काढला. आज सकाळी गणेश हंडोरे यांच्याविरोधात गोवंडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कलम 110, 125 (अ), (ब), 281, बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 (अ), (ब), 184 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कोण आहेत चंद्रकांत हंडोरे? चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत. तसेच ते महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते. मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दलित समाजाचा अग्रणी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्यावर्षी विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, परंतु काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.