“मुंबईतील कोविडच्या केसेस कमी होतायेत”
Updated On:

मुंबई – मुंबई शहरातील कोविडच्या केसेसचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे, असा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. अधिकाधिक लोकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे त्याकडे सर्वांनी अगत्यपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
फेब्रुवारी 2021 पासून शहरात कोविडमुळे जे रुग्ण मरण पावले त्यातील बहुतेक रुग्णांचे लसीकरण झालेले नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबईत मंगळवारी कोविडच्या 11 हजार 647 केसेस नोंदवल्या गेल्या. हे प्रमाण त्याच्या आदल्या दिवशीच्या रुग्णांपेक्षा 2 हजारने कमी होते. गेले चार दिवस सतत रुग्णसंख्या घटत आहे, असेही महापौरांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
अर्थात, रुग्णसंख्या कमी होत चालली आहे म्हणून लोकांनी निर्धास्त राहण्याची गरज नाही, काळजी घ्यायलाच हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.





