Cyber Fraud: शेअर मार्केटचा नाद पडला महागात, मुंबईतील व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी 5.7 कोटींना गंडवले

Share Market Scam: भारतात गेल्याकाही वर्षात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा मिळावा, यासाठी विविध मार्ग वापरले जातात. मात्र, याचा फायदा सायबर गुन्हेगारांकडून देखील घेतला जात आहे. मुंबईतील एका व्यक्तीला शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल 5.7 कोटी रुपयांना फसवल्याची घटना समोर आली आहे.
मुंबईतील एका राष्ट्रीयकृत बँकेत काम करणाऱ्या एका 53 वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केलीआहे. व्यक्तीची मागील 21 दिवसांमध्ये तब्बल 5.7 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी ॲक्सिस सिक्युरिटीचा कर्मचारी असल्याचे सांगून पैसे उकळले आहेत.
तक्रारदार व्यक्तीला अमन मलिक नावाच्या सायबर गुन्हेगाराने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे का? अशी विचारणा करणारा व्हॉट्सॲप मेसेज पाठवला. यावर उत्तर देताना त्यांनी ॲक्सिसच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर गुन्हेगाराने आपण ॲक्सिस सिक्युरिटीचा कर्मचारी असल्याचे सांगत त्यांना ‘Y21-VIP-WTIC World Top Investor Competition’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. या ग्रुपवर अनेकांनी शेअर मार्केटमधून नफा झाल्याची बनावट माहिती शेअर केली होती.
सायबर गुन्हेगारांनी त्यांचा विश्वास संपादन करत शेअर मार्केटसंदर्भात इतर माहिती देण्यास सुरूवात केली. तसेच, नफ्याचे आमिष दाखवले. त्यामुळे तक्रादार व्यक्तीने 18 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या दरम्यान विविध बँक खात्यांवर 5.7 कोटी रुपये ट्रान्सफर केले. मात्र, हे पैसे काढायला गेल्यावर मलिकने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ॲक्सिस सिक्युरिटीकडे चौकशी केली. मात्र, कंपनीने अशा कोणत्याही व्यक्तीची संबंध नसल्याचे सांगितले. याप्रकरणी त्यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील तपास करत आहे.




