पुणे | मुंबई- बंगळुरू महामार्ग १४ पदरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील बहुचर्चित मुंबई ते बंगळुरू या १४ पदरी महामार्गाचे काम सहा महिन्यांत सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. मुंबईतील अटल सेतूपासून हा महामार्ग सुरु होणार असून, तो पुण्यातील रिंगरोड जोडलेला असेल.
त्यामुळे वाहने पुणे शहरात न येता शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच, मुंबई ते बंगळूर हा प्रवास अधिक वेगवान होणार असल्याचे गडकरी म्हणाले.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात गडकरी बोलत होते. राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पुढील पन्नास वर्षांचा विचार करून बांधण्यात आला होता. मात्र आता हा महामार्ग अपुरा पडत आहे.
त्यामुळे अटल सेतूपासून बंगळुरूपर्यंत नवा महामार्ग करण्यात येणार आहे. तसेच हाच मार्ग छत्रपती संभाजीनगर रस्त्यालाही जोडला जाणार आहे. त्यामुळे पुणे ते औरंगाबाद हे अंतरही कमी होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
देशात विनाचालक वाहने नाहीत
परदेशात चालक विरहित वाहने येत आहेत. मात्र भारतात ही वाहन वापरु देणार नाही. देशातील २२ लाख लोक वाहनचालक आहेत.
विनाचालक वाहनांमुळे या लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. त्यांच्या नोकऱ्या गेल्या तर मोठाच प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मी असेपर्यंत या देशात विनाचालक वाहने येणार नाहीत, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.





