Mumbai Attack Case: तहव्वुर राणाला दिलासा नाही, 9 जुलैपर्यंत वाढली न्यायालयीन कोठडी

Mumbai Attack Case: दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर हुसैन राणाची न्यायालयीन कोठडी 9 जुलै 2025 पर्यंत वाढवली आहे. सुरक्षा कारणांमुळे राणाला शुक्रवारी व्हर्च्युअल पद्धतीने कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याने कुटुंबाशी संवाद साधण्याची परवानगी मागितली आणि आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. कोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाला 9 जूनपर्यंत राणाचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच, कुटुंबाशी संवादाच्या याचिकेवर 9 जून रोजी सुनावणी होणार आहे.
यापूर्वी 24 एप्रिल रोजी विशेष न्यायाधीश चंदर जीत सिंह यांनी राणाची कुटुंबाशी संवादाची याचिका फेटाळली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) याला विरोध करताना म्हटले होते की, राणा कुटुंबाशी बोलल्यास राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर करू शकतो.
पाकिस्तानी लष्कराच्या मेडिकल कोअरचा माजी अधिकारी असलेला राणा अलीकडेच अमेरिकेतून भारतात प्रत्यर्पित करण्यात आला आहे. त्याच्यावर 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची कट रचल्याचा गंभीर आरोप आहे. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जखमी झाले होते.

