पिंपरी | हवा गुणवत्ता शुद्धीकरणावर कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना फेल

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता ढासळल्यानंतर महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात प्रामुख्याने शहरातील धूळ कमी करणे हा उद्देश होता. अत्याधुनिक प्रणाली राबवत पालिकेने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला.
परंतु धूळ कमी होण्याएवजी वाढली असल्याचे पावसापूर्वी आलेल्या येणार्या सोसाट्याचा वाऱ्याने दाखवून दिले. गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी सुटलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणे अवघड झाले. सर्वत्र धूळच धूळ उडत होती. उंच इमारतींमध्ये असलेल्या सदनिकाधारकांना देखील खिडक्या दरवाजे बंद करुन घ्यावे लागले.
पालिकेच्या राष्ट्रीय शुद्ध हवा अभियान अंतर्गत शहर कार्य आराखड्यास (सिटी ऍक्शन प्लॅन) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी शहरातील रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या 2 वाहनांद्वारे साफसफाई केली जात आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील धूलिकणांचे प्रमाण कमी होणार असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे.
मुख्य चौकांचे हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन प्रणाली 5 वाहनांवर बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर यंत्रणा बसविलेच्या परिसरातील पीएम-10, पीएम-2.5, एसओएक्स, एनओएक्स इत्यादी वायु प्रदुषकांची पातळी मर्यादित राहणार आहे, असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता.याशिवाय शहरातील दूषित हवा शुद्ध करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध 17 चौकांत एअर प्युरिफिकेशन फाउंटन उभारण्यात आले आहेत.
त्या यंत्राद्वारे पाण्याचे तुषार हवेत सोडून हवेतील प्रदूषण कमी केले जाते. त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यातील एक फाउंटन पिंपरी चौकात उभारण्यात आला आहे. शहाराच्या मुख्य चौकांमध्ये बसविलेले महाकाय एअर प्युरिफायर केवळ शोभेची वस्तु बनून राहिले आहेत. लवकरच हे प्युरिफिकेशन फाऊंटन सुरू करण्याचे आश्वासन गेली अनेक महिन्याांंपासून महापालिका अधिकार्यांकडून दिले जात आहे.





