पिरंगुट (पुणे) – मुळशीकारांना पुन्हा एकदा हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून मुळशी आणि हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात येणार आहे. यामुळे मुळशीतील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
याबाबतची अधिसूचना सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी प्रसिद्ध केली आहे. मुळशीच्या स्वतंत्र बाजार समितीमुळे शेती व शेती उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
युती सरकारच्या काळात मुळशी आणि हवेली कृषी बाजार उत्पन्न समितीचे एकत्रीकरण करण्यात आले होते. त्यानंतर पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात आली होती. मुळशीकारांना आता हक्काची मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती परत मिळणार असून, त्यानुसार मुळशी तालुका कृषी बाजार समितीचे मुख्यालय हे पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या ताथवडे येथील 100 एकर प्रास्तावित जागेवर असणार आहे. मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी अरुण साकोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुळशी बाजार समितीने पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला 17 कोटी 58 लाख 7 हजार 373 रुपयांचे देणे आहे, पुढील पाच वर्षात ते द्यायचे आहे. मुळशीची स्वतंत्र बाजार समिती पुन्हा आस्तित्वात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, तसेच वाहतूक खर्च कमी होणार असून, शेतकऱ्याला फायदा होणार आहे, असे घोटवडे येथील प्रगतशील शेतकरी हनुमंत मातेरे यांनी सांगितले.
युतीच्या काळात बाजार समितीचे एकत्रीकरण झाले, तेव्हापासून मुळशी तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून मुळशीकरांना हक्काची बाजार समिती मिळणार आहे. ताथवडे येथील बाजार समितीच्या जागेचा न्यायप्रविष्ट प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय संचालक मंडळही निवडले जाणार आहे.
संग्राम थोपटे, आमदार
मुळशी आणि हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत लवकरच प्रशासकीय संचालक मंडळ निवडले जाणार असून, यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, या बाजार समितीचा स्थानिकांना फायदा होणार आहे.
गंगाराम मातेरे, अध्यक्ष, कॉंग्रेस कमिटी, मुळशी