मुळशीकर मावळ्याचा दुर्ग पराक्रम; एक हजारहून अधिक किल्ले सर

पिरंगुट – पिरंगुट (ता. मुळशी) येथील एका युवा मावळ्याने राज्यासह परराज्यातील एक हजारांहून अधिक गडकिल्ले सर केले आहेत. या युवकाने राजस्थानमधील मेहेरानगड नुकताच सर करीत एक हजार गडकिल्ले सर करण्याचा पराक्रम केला आहे.
छत्रपती शिवरायांच्या पायदळातील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे घराण्यातील युवा मावळा वंशज ऍड. मारुती गोळे यांनी 2012 पासून दुर्ग अभ्यासाचा छंद जोपासला आहे. गेल्या आठ वर्षांपासून आत्तापर्यंत त्यांनी देश-विदेशातील एक हजारांहून अधिक दुर्ग सर केले आहेत. किल्ले सिंहगड 500 पेक्षा अधिक वेळा सर करून त्यांनी विक्रमच केला आहे. याआधी गोळे यांनी आग्रा ते राजगड पायी वारी करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
2012 मध्ये मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर भटकंतीस गेलेल्या ऍड. गोळे यांनी त्यादिवसापासूनच किल्ले भ्रमंती सुरू केली आणि सलग 42 दिवस सिंहगड दुर्ग सर करण्याची किमया करून दाखवली. मनात दुर्गांविषयी प्रचंड आस्था निर्माण झाल्याने त्यांनी दुर्गाभ्यास करण्याचे ठरवले. याबरोबरच आजपर्यंत 1 लाख 65 हजारहून अधिक छायाचित्रे यानिमित्ताने जमवले आहेत.
या प्रवासात अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या या यशात पत्नी स्वाती गोळे आणि मुलगा यांची साथही तितकीच महत्त्वाची आहे. पत्नी सरदार मारणे घराण्यातील असून त्यांनीही सव्वाशेहून अधिक दुर्ग सर करण्यात सहभाग नोंदवला आहे, तर मुलगाही उत्तम गिर्यारोहक आहे. महाराष्ट्र, गोवा, जम्मू, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांतील सर्व गड पाहून झाले आहेत.





