पुणे जिल्हा | मुळशी ते वाघवाडी लॉन्चसेवा अचानक बंद

पौड, (वार्ताहर) – मुळशी धरणातील मुळशी ते वाघावाडी ही लॉन्चसेवा पर्यायी व्यवस्था न करता बंद केल्याने या भागातील विद्यार्थी, कामगार व ग्रामस्थ यांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले आहेत. 9 जुलैपासून ही लॉन्चसेवा बंद असल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजारी रूग्णांना रूग्णालयात तात्काळ न्यायचे कसे, असा यक्ष प्रश्नही येथील ग्रामस्थांपुढे ढाकला आहे.
पुणे जिल्हा परिषद मार्फत मुळशी धरण भागातील मुळशी ते वाघवाडी ही लॉन्च सेवा कित्येक वर्षे सुरू आहे. मुळशी धरण भागातील शिरगाव, वडगाव, वाघवाडी, भीमनगर, भादसखोंडा, लिंबारवाडी, वडुस्ते, वांद्रे, भोरकस, पिंपरी, गोठे, आहेरवाडी, सुसाळे, हिरडी येथील ग्रामस्थांचा तसेच शाळकरी मुले, शिक्षक वर्ग, कामगार यांचा दैनंदिन दळणवळण लॉन्चमार्गे होत असते.
ही सेवा अचानक 9 जुलैपासून जिल्हा परिषद मार्फत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील जनतेची दळणवळणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दळणवळणसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सुरूवातीला 50 वर्षे होडीची सुविधा होती. त्यानंतर लॉन्चसेवा 1992 पासून सुरू झाली होती. ती सेवा 2018 पासून कंत्रांटी पद्धतीने सुरू करण्यात आली.
सध्या धरणात सुरू असलेली लॉन्च 12 वर्षांपासून धरणात वाहतूक करत आहे. या लॉन्चची जिल्हा परिषदेच्या वतीने सागरी अभियंता व चिफ सर्वेअर, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणात लॉन्चची दुरूस्ती करून घ्यावी, असे सांगण्यात आले. या लॉन्चच्या दुरूस्तीला किंवा नवीन लॉन्च येण्यासाठी सहा ते सात महिन्याचा कालावधी लागू शकतो. तसेच ही लाँन्च दुरूस्तीसाठी गुजरात येथे न्यावी लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची वाहतूक करताना कोणतीही अघटीत समस्या घडू नये म्हणून ही बोट बंद ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
चाळीस किलोमीटरचा वळसा
कामगार, विद्यार्थी किंवा इतर नागरिकांना सरकारी कामकाजाला जाण्यासाठी तसेच बाजारपेठेला जाण्यासाठी रस्त्यामार्गे निवे या ठिकाणी येऊन मग पुढे जावे लागत आहे. वाघवाडी येथून समोर दिसणार्या मुळशी या गावी येण्यासाठी चाळीस किलोमीटरचे अंतर रस्त्याने पार करावे लागत आहे.
राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष
या भागातील रस्ताही खूप खराब झाला आहे. तालुक्यातील राजकीय नेत्यांचे या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. लॉन्चसेवा बंद असल्याचे कोणी गांभीर्याने दखल घेत नाही. अधिकारी लोक उडवाउडवीची उत्तर देतात. तरी ही लॉन्च सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
मुख्यमंत्र्यांना पत्र
मुळशी धरण मधील प्रवासी लॉन्च बंद झाल्यामुळे नागरिकांच्या होणार्या गैरसोय बद्दल तत्काळ उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांस कडे पत्राद्वारे स्वराज संघटनेचे पुणे जिल्हा निमंत्रक राजू फाले यांनी मागणी केली आहे.





