चिकन, मटणावर खवय्ये पडले तुटून !

खरेदीसाठी मुळशी तालुक्‍यात झुंबड : सोशल डिस्टंन्सिगचा "फज्जा'

पिरंगुट : खरेदीसाठी शिथिलता मिळताच मुळशीत नागरिकांनी रविवारी (दि. 19) गर्दी केली होती. विशेषतः मटण मार्केटमध्ये खवय्यांची मोठी रांग लागली होती. यात सगळीकडे मात्र सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा उडाला होता.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील काही गावांमध्ये लॉकडाऊन जाहिर केलेला आहे. मंगळवार (दि. 14) जुलै ते गुरुवार (दि. 23) या कालावधीत मुळशी तालुक्‍यातील 6 गावात टाळेबंदी आहे. तालुक्‍यात अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने टाळेबंदी पुकारली आहे.

टाळेबंदीच्या काळात रविवारपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवेबरोबरच भाजीपाला विक्रीस सशर्त परवानगी देण्यात आली आहे. तसेच आखाड महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने चिकन, मटण आणि मासे विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच मटण मार्केटमध्ये खवय्यांनी गर्दी केली होती.

भूगाव, पिरंगुट, घोटवडेफाटा, उरवडे, घोटवडे, पौड आदी भागात मांसविक्रीच्या दुकानात गर्दी होती. पिरंगुट आणि भूगावमध्ये दुकानासमोर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर भाजी विक्रीची दुकाने खुली असल्याने याठिकाणीही गर्दी होती. खरेदीसाठी सूट मिळाल्याने नागरिकांनी गर्दी केल्याने सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा उडाला होता. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.

दरम्यान, गर्दीला अटकाव करण्यासाठी पौड पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच न ऐकणाऱ्या नागरिकांना लाठीचा प्रसाद दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.