प्रभात वत्तसेवा पौड – पौड येथे झालेल्या मुळशी तालुक्यातील ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) व बहुजन समाजाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षित गट व गणामध्ये सर्व ओबीसींनी खर्या ओबीसी उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आणि पक्षभेद विसरून एकत्र ओबीसी उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा एल्गार पुकारला. समाजातील सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांनी सांगितले की, गेल्या काही काळात खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रांवर उमेदवारी घेणार्यांमुळे खर्या ओबीसींचा आवाज दडपला गेला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खर्या ओबीसी प्रतिनिधीला न्याय मिळवून देण्यासाठी व लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी समाज एकत्र येणार आहे. झालेल्या बैठकीत मध्ये सर्व राजकीय पक्षाचा नेत्यांनी ओबीसी आरक्षित वॉर्ड मध्ये मूळ ओबीसी समाजाच्या उमेदवाराला संधी द्यावी अशी एकमुखी मागणी केली आहे व या मागणीला जे राजकीय पक्ष प्रतिसाद देणार नाहीत. त्यांना तीव्र परिणाम भोगावे लागतील असा इशारा या बैठकीच्या निमित्ताने देण्यात आला. तसेच कुणबीसाठी जर शासनाला राजकीय आरक्षण द्यायचे असेल तर ते ओबीसी आरक्षण मधून न देता ते स्वतंत्र द्यावे व राजकीय न देता नोकरी आणि शैक्षणिक द्यावे अशी मागणी करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआय व इतर पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी तसेच विविध गावांतील ओबीसी बांधव, युवक, महिलावर्ग व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीतून झालेला एकमुखी निर्णय पाहता आगामी काळात मुळशी तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.