Om Bhutkar Wedding: ‘मुळशी पॅटर्न’ फेम ओम भूतकरची गुपचूप लग्नगाठ! पत्नी प्रेरणा सेठिया कोण? पहिला फोटो आला समोर
Om Bhutkar Wedding ओम भूतकर सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही. त्याचे इन्स्टाग्राम अकाउंटही प्रायव्हेट असल्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती फार कमी लोकांना होती. त्यामुळे त्याने लग्न केल्याची बातमी अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरली. लग्नाचे फोटो त्याच्या जवळच्या मित्रांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ही आनंदाची बातमी सर्वांसमोर आली.

Om Bhutkar Wedding: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ओम भूतकर याने चाहत्यांना सुखद धक्का देत गुपचूप लग्न केले आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या ओमच्या लग्नाचे पहिले फोटो आता सोशल मीडियावर समोर आले असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ओमने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच गोपनीयता राखली होती. त्यामुळे त्याच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ओम भूतकर सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही. त्याचे इन्स्टाग्राम अकाउंटही प्रायव्हेट असल्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती फार कमी लोकांना होती. त्यामुळे त्याने लग्न केल्याची बातमी अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरली. लग्नाचे फोटो त्याच्या जवळच्या मित्रांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ही आनंदाची बातमी सर्वांसमोर आली.
ओमच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेता अभय महाजन, अलोक राजवाडे आणि अभिनेत्री पर्ण पेठे यांच्यासह अनेक जवळचे मित्र आणि कुटुंबीय या सोहळ्यात सहभागी झाले होते. ओमच्या मित्राने लग्नातील एक सुंदर फोटो शेअर करत, “ओमजी लग्नाची शपथ घेताना, एक ‘प्रेरणा’दायी क्षण,” असे भन्नाट कॅप्शन दिले. या पोस्टनंतर सोशल मीडियावर ओमच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली.
ओम भूतकरच्या पत्नीचे नाव प्रेरणा सेठिया आहे. प्रेरणाने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये स्वतःची ओळख ‘वाइल्डलाइफ कन्झर्वेशनिस्ट’ अशी दिली आहे. म्हणजेच ती वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करते. सध्या तिच्याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नसली, तरी ओमच्या चाहत्यांमध्ये तिच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

om bhutkar
ओम भूतकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मुळशी पॅटर्न’मधील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. त्यानंतर ‘रावरंभा’, ‘श्यामची आई’ आणि ‘आता थांबायचं नाय’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने दमदार अभिनय केला. प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा दाखवत त्याने स्वतःचा चाहता वर्ग तयार केला आहे.
अभिनयासोबतच ओमचा ‘सुखन’ हा कार्यक्रमही खूप लोकप्रिय आहे. उर्दू साहित्यावर आधारित या संगीत कार्यक्रमाचे संकलन आणि दिग्दर्शन स्वतः ओमने केले आहे. कथाकथन, गझल, नज्म आणि सूफी संगीत यांचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात अनुभवायला मिळतो. त्यामुळे अभिनयाबरोबरच एक संवेदनशील आणि कलाप्रेमी कलाकार म्हणूनही त्याची ओळख आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, नुकताच ओम ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटात दिसला होता. तसेच लवकरच तो दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘खाशाबा’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रकल्पांचीही चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, ओम भूतकरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहते त्याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. आपल्या साधेपणामुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या ओमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





