Mulshi News : मुळशीत ठेकेदाराची दादागिरी! अधिकाऱ्याला ‘घोडा’ दाखवून दिला दम

पुणे : आमदार साहेब…त्याच्या कामाचा दर्जा चांगला नसल्यामुळे त्या ठेकेदाराचे काम बंद केले होते. मात्र, त्याने थेट अधिकाऱ्यांना ‘घोडा’ दाखवून काम सुरू करण्यास भाग पाडले. दमदाटी करून सगळे ठेके तोच घेणार असेल आणि कामाचा दर्जाही नसेल तर विकास कसा होणार, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी मांडल्या. ही व्यथा आहे मुळशी तालुक्यातील. भोर, वेल्हा, राजगड विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी व्यथा मांडली. त्यावर आमदार मांडेकर यांनी असा प्रकारे ठेकेदारांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. तसेच जो कोणी ठेकेदार आहे, त्या ठेकेदाराच्या आजपर्यंतच्या कामाची चौकशी करण्याचे आदेशही मांडेकर यांनी दिले.
मुळशी तालुक्यात सुरु असलेली विकास कामांचा आढावा तसेच विविध विभागांमध्ये नागरिकांना येणार्या समस्या आदींबाबतची बैठक घोटावडे फाटा येथील एका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. आमदार शंकर मांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुळशीचे तहसिलदार विजयकुमार चौबे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्यासह महावितरण, कृषी विभाग, पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मुळशी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींसह इतर पदाधिकारी सुध्दा उपस्थित होते.
या बैठकीत विविध गावच्या नागरिकांनी त्यांच्या गावात सुरु असलेल्या विकासकामांबाबत येणार्या अडचणी मांडल्या. यावेळी मांदेडे येथील एका ग्रामस्थाने आमच्या भागातील रस्तांची तसेच इतर कामे खराब झाली असल्याच्या तक्रारी केल्या. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाची कामे केली असल्याचे सांग़ितले. तसेच आम्ही काम अडविले तर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अधिकारी हे जागेवर आले असता या ठेकेदाराने कंबरेला लावलेला घोडा अधिकारी यांना दाखवत अप्रत्यक्षरित्या दम देत काम सुरुच ठेवले. या ठेकेदाराकडे बंदुक आहे. त्यामुळे त्याला सर्व घाबरतात. ग्रामस्थांनी हा मुद्दा सुमारे पाचशे लोकांसमोर मांडला. त्यावेळी सर्व उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, नागरिक अवाक् झाले.
यावेळी इतर पदाधिकारी म्हणाले की, आम्ही निधी आणतो, संबधित ठेकेदार कुणालाच विचारात नाही. या ठेकेदारांने एकाच वेळी मुळशीतील 47 कामे मिळविली आहेत. सर्व कामांच्या निविदा कमी दराने भरल्या आहेत. तसेच त्याने उपठेकेदार नेमून कामे दिली आहेत. त्यामुळे कामाची गुणवत्ता कशी राखली जाणार, असा सवालही केला. तसेच या ठेकेदाराच्या सर्व कामाची जिल्हा परिषदेमार्फत चौकशी करावी. चौकशी करूनच बिले काढावीत, त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असे सांगितले.
तसेच हा विषय बैठकीच्या इतिवृत्तामध्ये सुध्दा घ्यावा, जेणेकरून पुढील बैठकीच्या वेळी याचा आढावा घेता येईल. यावर आमदार मांडेकर यांनी सुध्दा या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत ठेकेदारांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. या ठेकेदाराने आतापर्यंत केलेल्या कामाची चौकशी करा, असे सुध्दा सांगितले. या ठेकेदारांच्या कारनाम्यामुळे अनेक निकृष्ट दर्जाच्या कामांची पोलखोल होणार आहे.





