Mulshi News – रिहे (ता. मुळशी) येथील शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ घोटावडेफाटा येथील चौकात बुधवारी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि महसूल प्रशासनाच्या विरोधात झालेल्या या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला. रिंगरोड प्रकल्पासाठी बाधित क्षेत्रात येत असल्याचे कारण देत एमएसआरडीसीकडून शिंदे यांचे घर, गोठा आणि पोल्ट्री शेडवर बुलडोझर फिरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कुटुंबीय व जनावरे बेघर झाल्याने संताप व्यक्त होत आहे. संबंधित जमीन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि मोबदला देऊनच ताबा घेण्याचे आश्वासन दिलेले असतानाही ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. विलास शिंदे यांनी सांगितले की, सुमारे 80 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाचा या ठिकाणी वास्तव आहे. कुटुंबात 93 वर्षीय वडील, पत्नी व मुले असून गोठ्यात 15 गायी आहेत. जमिनीबाबत वाद सुरू असल्याने मोबदला मिळालेला नाही. प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी मोबदला दिल्याशिवाय ताबा घेणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता 18 एप्रिल रोजी पोलिस बंदोबस्तात कुक्कुटपालन शेड व गोठा जेसीबीद्वारे पाडण्यात आला. त्यानंतर 20 एप्रिल रोजी रात्री घरावरही कारवाई करण्यात आली. घर पाडताना दोन दिवसांची मुदत मागूनही ती नाकारण्यात आली, असा आरोप शिंदे यांनी केला. ग्रामस्थांनी तत्परता दाखवत घरातील काही साहित्य बाहेर काढले. या घटनेनंतर शिंदे कुटुंबाने आपली व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावरून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका होत आहे. सध्या शिंदे कुटुंब बेघर झाले असून जनावरेही उघड्यावर आल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.