प्रभात वृत्तसेवा पौड – मुळशी तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पौड गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुळशीचे माजी सभापती कोमल वाशिवले या प्रबळ दावेदार म्हणून पुढे आल्या आहेत. आजपर्यंत त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर तसेच नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासामुळे त्यांना मोठा जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र आहे. तशी पक्षाकडे त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोमल वाशिवले यांनी आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित विविध कामांना प्राधान्य दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना केल्यामुळे त्यांची प्रतिमा कार्यक्षम व लोकाभिमुख नेत्या अशी निर्माण झाली आहे. याच कामाच्या जोरावर आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या प्रबळ दावेदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.पौड गणात वाशिवले यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्येही त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास पौड गणात कोमल वाशिवले यांचा विजय निश्चित मानला जात आहे.