Mulshi Crime – मुळशी तालुक्यातील मांडवखडक, वेगरे येथे 19 वर्षीय मतिमंद व दिव्यांग तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पौड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गजानन भागू पवार (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी 1 मे 2026 रोजी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. आरोपी हा कातकरी समाजातील असून डोंगराळ व दुर्गम भागात वास्तव्य करणारा असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. या प्रकरणाच्या तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, निवास जगदाळे, सिद्धेश पाटील, वैभव सुरवसे व नवनाथ शिंदे यांची विशेष पथके तयार करण्यात आली होती. विविध ठिकाणी शोधमोहीम राबविल्यानंतर आरोपी लोणावळा ग्रामीण परिसरातील पवनानगर भागात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आज (दि. 7) आरोपीला ताब्यात घेत अटक केली. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अधिक तपास पौड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.