प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव डंपरच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे शनिवारी (दि. २२) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली.वैभव मालपोटे (वय २२) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. बाबाराव सोनबा पवार (वय ३६, रा. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोविंद बाबुराव मालपोटे (वय ७२, रा. कातरखडक, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी शनिवारी याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा पुतण्या वैभव मालपोटे हे आपल्या दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या ओव्हर लोड डंपरने वैभव याच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात वैभव याचा मृत्यू झाला. तसेच वैभव चालवत असलेल्या दुचाकीचेही नुकसान केले. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.