मुळा मुठा नदीकाठचे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात; वॉटर मीटर मोहिमेच्या विरोधात आमरण उपोषण करणार

वाघोली : पूर्व हवेली मधील मुळा मुठा नदीकाठचे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात असून वॉटर मीटर हटाव शेतकरी बचाव ही मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत पुढील महिन्यात 11 तारखेला शेतकरी आमरण उपोषण करणार असल्याने वॉटर मीटर मोहिमे विरुद्ध शेतकरी आक्रमक झाले आहेत. पूर्व हवेली मधून जाण्यात येणाऱ्या मुळा मुठा नदीच्या सांडपाण्यावर दहा पट शुल्क आकारण्यात येणार असून वॉटर मीटर मोहिमेद्वारे हे शुल्क शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयास विरोध करण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी वाडे बोल्हाई येथे बावीस गावातील शेतकऱ्यांची बैठक होऊन वॉटर मीटरही नको व दुषित केमिकलयुक्त मैला सांडपाण्यावर पाणीपट्टीही नको असा ठराव पास होवून कार्यकरी अभियंता जलसंपदा विभाग यांना १६ नोव्हेंबर २०२३ रोजी निवेदन देण्यात आले होते. ४ महिन्यानंतर २२/०३/२०२४ रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊनही प्रशासन उदासीन दिसून आले आहे.
खडकवासला धरणातून शेती सिंचनासाठी पाणी सोडत नसल्याचे लेखी उत्तर मुळा-मुठा नदी काठच्या शेतकऱ्यांना उपकार्यकारी अभियंता, खडकवासला पाठबंधारे विभागाकडून प्राप्त झालेले आहे. तसेच पुणे शहराने जलसंपदा विभागाकडून पुणे शहरासाठी घेतलेल्या पाण्यावर पुणे महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर पाणी पट्टी भरते. असे एकदा पाणीपट्टी भरलेले पाणी वापरुन झाल्यावर तेच पाणी पुन्हा नदीत सोडल्यानंतर त्याच दुषित केमिकलयुक्त मैला सांडपाण्यावर दुसऱ्यांदा दहा पट पाणी पट्टी आकारण्याचे काम जलसंपदा विभाग करित आहे.
सेंट्रल पोलुशन कन्ट्रोल बोर्डाने सन २००८-२००९ रोजी भारतातील जम्मू काश्मिर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्व नद्यांच्या प्रदुषणाबाबत सर्व्हे केला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ५९ नद्यांपैकी पुणे येथील मुळा-मुठा नदी व मुंबई येथील मिठी नदी सर्वात दुषित असल्याचे निदर्शनास आणले असून याचा अहवाल महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. ड्रेनेजच्या दुषित मैला पाण्यामुळे जमीनी नापिक झालेल्या आहेत. विहीर बोअरवेल खराब होवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शरिराचे आजार/ विकार त्वचा रोग, अशा गंभीर आजारांमध्ये वाढ होत आहे. डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून पर्यावरण दुषित झाले आहे.
मुळा मुठा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून ती गटार गंगा झालेली आहे. विरघळलेला ऑक्सिजन, जैव ऑक्सिजन, आम्ल, अल्कली प्रमाण व अमोनिकल नायट्रोजन प्रमाण जास्त झाल्याने नदीपात्रातील विविध मासे, कासव, जलचर जीव मृत पावले आहेत व जलचर वनस्पती नष्ठ झालेल्या आहेत. याबाबत मुळा-मुठा नदीकाठच्या अनेक ग्रामपंचायतींनी वरील कारणास्तव मीटरही नको व पाणीपट्टीही नको असे ग्रामसभेचे / मासिक सभेचे ठराव पास केलेले आहेत.
जलसंपदा विभागाने सदरच्या निवेदनानूसार त्वरीत मुळा मुठा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना पाणीपट्टी आकारणीच्या जाचातून मुक्त करावे अन्यथा प्रशासनाची अक्षम्य उदासिनता लक्षात घेवून दि. ३१/०७/२०२४ रोजीच्या शेतकरी मेळाव्यात घेतलेल्या निर्णयानूसार सोमवार दि. ११/११/२०२४ पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे शेतकरी नेते अंकुश कोतवाल यांनी सांगितले आहे.





