Pimpri : हॉर्टीकनेक्ट इंडिया प्रदर्शनात मुकुंद ठाकर यांचा सन्मान

पवनानगर : बंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात पार पडलेल्या हॉर्टीकनेक्ट इंडिया २०२५ या भव्य आंतरराष्ट्रीय फुल उत्पादकांच्या प्रदर्शनात येळसे येथील प्रगतशील गुलाब उत्पादक शेतकरी मुकुंद ठाकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डच गुलाबांच्या टॉप ग्राफ्टिंग नर्सरीचे मालक असलेले ठाकर यांनी केवळ एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरून सुरुवात करून तब्बल ५० एकरांवरील अत्याधुनिक पॉलीहाऊस प्रकल्प उभा केला आहे. जागतिक दर्जाचे गुलाब उत्पादन करून त्यांनी महाराष्ट्रातील तसेच देशातील फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.
हॉर्टीकनेक्टच्या कोअर कमिटीतील नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, मुकुंद ठाकर यांचा प्रवास म्हणजे चिकाटी आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय फुलोद्योग जागतिक स्तरावर पोहोचत आहे.
या प्रदर्शनात देशभरातील शेकडो शेतकरी, संशोधक, कंपन्या आणि निर्यातदार सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या व्यासपीठावर महाराष्ट्रातील गुलाब उत्पादकाचा सन्मान झाल्याने मावळ आणि राज्यातील कृषी क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
हा सन्मान माझा नसून महाराष्ट्रातील सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. परिश्रम, चिकाटी आणि योग्य तंत्रज्ञान यांचा संगम साधल्यास भारतीय शेतकरी जागतिक बाजारातही आपले स्थान निर्माण करू शकतो.
– मुकुंद ठाकर, प्रगतशील शेतकरी





