सप्टेंबरमध्ये नोंदणी केल्यास दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही; मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

गडचिरोली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहे. मात्र 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
काय म्हणाल्या अदिती तटकरे?
लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल. आतापर्यंत 70 ते 75 टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
अर्जाची अंतिम तारीख काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही. तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.





