पुणे : जमीन व्यवहारातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात हॉटेल व्यावसायिक मुकेश पौडवाल याला सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, परवेझ जमादार, स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र जैन, प्रकाश फाले या सर्वांसह 11 जणांवर गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात पौडवाल याने ऍड. रफिक शेख आणि ऍड. बी. आर. शेडगे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पौडवाल फिर्यादींना ओळखत नाहीत. त्यांच्यात कोणताही व्यवहार झालेला नाही. फोनवर संभाषण अथवा कधीही भेट् झालेली नाही. तसेच, त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. ते मोठ्या कालावधीपासून मुंबई येथे राहत होते. त्यांना या गुन्ह्यात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे, असा युक्तीवाद ऍड. रफिक शेख यांनी केला.
याबबत कैलास शिवाजी शिरसाट (वय 30, रा. काळेपडळ, ता. हडपसर) यांनी हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे. फाले याने जमिनीचे व्यवहार करत असल्याचे सांगून, गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम मिळविण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार, फिर्यादींनी 10 लाख, त्यांच्या मेहुण्याने 20 लाख रुपये गुंतविले होते. ही रक्कम परत मागितली असता फाले याने त्यांना धमकाविले, शैलेश जगतापने पिस्तुल दाखविले आणि अन्य काहींनी धमकाविल्याचे म्हटले आहे.