मुकेश अंबानींनी पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी केली ‘ही’ घोषणा

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 26 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. “22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप भारतीयांच्या मृत्यूबद्दल मी आणि रिलायन्स कुटुंब संतप्त आणि शोकाकुल आहोत,” असे अंबानी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.
अंबानी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती हृदयपूर्वक संवेदना व्यक्त केल्या. “या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या पूर्ण आणि लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन सर एच.एन. रुग्णालयात सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील,” असे त्यांनी जाहीर केले. “दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. कोणीही त्याला कोणत्याही प्रकारे पाठिंबा देऊ नये,” असेही ते म्हणाले. “रिलायन्स कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार आणि संपूर्ण देशासोबत दहशतवादाविरुद्धच्या निर्णायक लढाईत खंबीरपणे उभे आहे,” असे अंबानी यांनी शोकसंदेशात नमूद केले.
पंतप्रधानांचा इशारा –
यापूर्वी आज, बिहारमधील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याबाबत कठोर शब्दांत इशारा दिला. “22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप लोकांचा जीव घेतला. या घटनेने देश शोकाकुल आणि वेदनेत आहे. आम्ही पीडित कुटुंबांसोबत आहोत.
आज बिहारच्या भूमीतून मी सांगतो, भारत प्रत्येक दहशतवादी, त्यांचे हँडलर्स आणि समर्थकांना शोधून शिक्षा करेल. आम्ही त्यांचा पाठलाग पृथ्वीच्या शेवटपर्यंत करू. दहशतवाद कधीही भारताचा आत्मा तोडू शकणार नाही. दहशतवादाला शिक्षा नक्की होईल,” असे मोदी म्हणाले. त्यांनी मधुबनी येथे हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली म्हणून मौन पाळले. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.





