सलग पाच सुट्ट्यांमुळे एमटीडीसीचे रिसोर्ट फुल्ल

पुणे – हिरवीगार वनराई…पावसाची रिमझिम…धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद आणि दाट धुक्यांच्या छायेत निसर्गाचा अनुभव घेण्यास पर्यटक पसंती देत आहेत. शनिवार (दि.12), रविवार (दि.13) सलग सुट्ट्या सोमवारी सुट्टी घेतली की, स्वातंत्र्य दिन (दि,15), पतेती (दि.16) अशा सलग सुट्या आल्याने पाच दिवस पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची हिलस्टेशन, गडकिल्ले, समुद्रकिनारे अशा ठिकाणांकडे पाऊले वळत आहे.
एमटीडीसीच्या रिसॉर्टचे बुकींग मागील एक महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले आहे. सहकुटुंब, मित्र, नातेवाईक यांच्यासह पर्यटनाला जाण्याचा कल वाढत आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी काहींनी माळशेज, माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणीला पसंती दिली आहे. तर गड किल्ल्यांचे हौस असणाऱ्यांनी रायगड, प्रतापगड, शिवनेरी, राजगड गाठण्याचे ठरविले आहे. समुद्रकिनाऱ्याची ओढ असणाऱ्यांनी अलिबाग, गणपतीपुळे, दिवेआगार या स्थळांची निवड केली आहे.
एमटीडीसीचे रिसॉर्ट फुल्ल झाले असले तरी निवास-न्याहारीची व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा आणि पर्यटकांची सोय व्हावी, यासाटी ही सुविधा निर्माण केली आहे. निवास न्याहारीची व्यवस्था कोठे आहे, याबाबतची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी बुकींग करून राहण्याची व्यवस्था करू शकतात, अशी माहिती एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या ठिकाणचे रिसॉर्ट फुल्ल…
माळशेज, माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणांबरोबरच कोकणात जाण्याकडे जास्त कल आहे. यामुळे एमटीडीसीच्या तारकर्ली, आंबोली, हरिहरेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, महाबळेश्वर, माथेरान, कार्ला, माळशेज, माथेरान याचसह अंजिठा, वेरुळ येथील एमटीडीसीचे रिसॉर्ट फुल्ल झाले आहेत, अशी माहिती एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली.




