Msrtc news : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना एसटी महामंडळाच्या नियोजनाचा अभाव समोर आला आहे. राज्यात २५१ आगार आणि ६१० स्थानके असताना प्रवाशांसाठी केवळ १२२ आरक्षण केंद्रे उपलब्ध आहेत. यामुळे आरक्षित तिकीट मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. एसटीचे मोबाइल अॅप आणि संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक प्रवाशांचा कल प्रत्यक्ष आरक्षण केंद्रावर जाऊन तिकीट काढण्याकडे आहे. ऑनलाइन बुकींग करताना पैसे वजा होणे पण तिकीट न मिळणे, अशा तक्रारींमुळे प्रवाशांना केंद्रावर गर्दी करावी लागत आहे. एसटीने २०२६ मध्ये ‘ई-बिक्स’सोबत करार केल्यानंतर खाजगी आरक्षण केंद्रे बंद केली, मात्र त्याऐवजी नवीन व्यवस्था उभी केली नाही. आरक्षण केंद्रांवर पिण्याचे पाणी आणि बसण्याची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. आरक्षित तिकिटासाठी दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागते,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत. हक्काचे आसन मिळवण्यासाठी जादा पैसे मोजूनही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.