निलंबनाचा धसका : आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उस्मानाबाद – साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तुळजापूर तालुक्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दिवभरातील ही दुसरी घटना आहे. सहकाऱ्यांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा धसका घेतल्यामुळे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या अन्य् सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
किरण घोडके असे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून ते तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथिल रहिवासी आहेत. घाेडके याची अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झाली होती. घोडके यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे ते खासगी वाहनांवर देखील काम करत होते.
दरम्यान आज 24 तासात कामावर रुजू व्हा अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा या कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून पाठविण्यात आल्या आहेत. याशिवाय संपादरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. निलंबनाच्या कारावाईच्या भीतीने घोडके यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातूनच त्यांची प्राणज्योत मालावली असा दावा त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यासाठी संप पुकारला आहे. मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहील यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. मात्र एसटी महामंडळाला यावर तोडगा काढण्यात अद्याप तरी यश आले नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असताना महामंडळाकडून निलंबनाच्या कारवाईचा सपाटा सुरुच आहे. अशा परिस्थितीत एसटी कर्मचारी अडकला असून आज दिवसभरात दोन एसटी कर्मचाऱ्यांचा हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे संपामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.





