- खोदकाम करताना भूमिगत वाहिन्या तोडल्या
- सांगवी परिसरात वीज पुरवठा खंडित
पिंपरी – सांगवी परिसरात सुरु असलेल्या पोकलॅण्डच्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वाहिन्या तोडल्याच्या दोन प्रकारांमध्ये नवी सांगवी व जुनी सांगवीमधील वीज ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. सांगवी पोलीस ठाण्यामध्ये या दोन्ही प्रकरणात संबंधित कंत्राटदारांविरुद्ध तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपरी विभाग अंतर्गत सांगवी फाटा परिसरातील ढोरे पाटील पुलाजवळ रस्ता रुंदीकरणासाठी पोकलॅण्डने खोदकाम सुरु आहे. त्यात गुरुवारी (दि. 24) सकाळी साडे नऊ वाजता महावितरणची उच्चदाब वीजवाहिनी तोडण्यात आली. परिणामी जुनी सांगवी परिसरातील सुमारे 12 हजार 500 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. पुन्हा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 25) दुपारी साडे बारा वाजता नवी सांगवीमधील शितोळे पेट्रोल पंपजवळ ड्रेनेजच्या कामासाठी पोकलॅनद्वारे खोदकाम सुरु होते. त्यातही उच्चदाब वीजवाहिनी तोडण्यात आल्याने नवी सांगवीमधील सुमारे 1900 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
या दोन्ही प्रकारांमध्ये महावितरणचा कोणताही दोष नसताना देखील वीजग्राहकांचा रोष पत्करावा लागला. तसेच तोडलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचा आर्थिक खर्च आणि वीजविक्रीचे नुकसान देखील सहन करावे लागले. या दोन्ही प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात महावितरणकडून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. याबाबत सांगवी पोलिसांकडे विचारणा केली असता गुन्हा दाखल केला नसून तक्रार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
चार्जिंग संपल्याने कंपन्यांकडे धाव
सांगवी व पिंपळे गुरव भागात शेकडो आयटीयन्स व इतर क्षेत्रातील उच्च पदस्थ नोकरदारांचे वास्तव्य असून, करोनामुळे गेली सव्वा वर्षांपासून आयटीयन्स व इतर कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. मात्र, खोदकामामुळे उच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने या परिसराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने बहुतांशी सर्वच आयटीयन्सच्या लॅपटॉपचे चार्जिंगचे संपले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करावेच लागणार असल्याने सर्वच आयटीयन्स व इतर प्रोफेशनल्सनी सांगवी बाहेरील आपल्या परिचितांकडे किंवा थेट कंपन्यांकडे धाव घेतली.
दहा तासांपेक्षा अधिक वेळ वीजपुरवठा खंडीत
महावितरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नवी सांगवी परिसरातील वीजवाहिनी तुटल्याने या परिसराचा वीजपुरवठा सहा तास खंडीत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, या परिसरातील वीजपुरवठा दहा तासांपेक्षा अधिक वेळ खंडित झाला होता, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. यामुळे अनेकांच्या पाल्यांना ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होता आले नाही तर अनेकांचे वर्क फ्रॉम होम ठप्प पडले.