MSEDCL Pune – वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने आक्रमक भूमिका घेतली असून पुणे परिमंडलात मोठ्या प्रमाणावर वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या गुढीपाडवा, रमजान ईद आणि श्रीराम नवमी यांसारखे सण जवळ येत असताना वीजग्राहकांनी आपले थकीत वीजबिल तातडीने भरून “पाडवा गोड करा” असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलात सध्या तब्बल ३१९ कोटी ५० लाख रुपयांची वीजबिल थकबाकी असल्याचे समोर आले आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत धडक मोहीम राबवण्यात येत असून १ मार्चपासून आतापर्यंत ७१२२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणकडून विभागनिहाय विशेष पथके तयार करून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नाइलाजास्तव खंडित करावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मार्च एंड मोहिमेअंतर्गत थकबाकी शून्य करण्यासाठी ही कारवाई वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करताना वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. तसेच वीजपुरवठा बंद झाल्यानंतर पुनर्जोडणीसाठी अतिरिक्त शुल्क ग्राहकांना भरावे लागणार असल्याने नागरिकांनी वेळेत वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात अडचणी टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीसह वीजबिल तात्काळ भरून महावितरणला सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.