हरिविजय महाराज क्षीरसागर यांना मृदंगरत्न पुरस्कार

आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीतील प्रसिद्ध मृदंगवादक ह.भ.प. हरिविजय महाराज क्षीरसागर यांना शुक्रवारी (दि. 14 एप्रिल) शांतीब्रम्ह गुरुवर्य ह.भ.प. मारोती महाराज कुऱ्हेकर बाबा यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मृदंगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैराग्यमूर्ती वै. जयराम बाबा भोसले यांच्या 15व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सप्ताहातील काल्याच्या कीर्तनानंतर क्षीरसागर महाराज यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वै. जयराम बाबा सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेद्वारा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी सोहळ्याचे आयोजक ह.भ.प. बाळासाहेब महाराज शेवाळे, माजी विरोधीपक्ष नेते डी. डी. भोसले, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. हरिविजय महाराज हे राज्यातील प्रसिद्ध मृदंगवादक असून त्यांनी आळंदी येथे ह.भ.प. अशोक महाराज पांचाळ गुरूजी यांच्याकडून मृदंगवादनाचे ज्ञान आत्मसात केले आहे.
सोहळ्यात 7 ते 14 एप्रिल दरम्यान दैनंदिन सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेतील नित्यपाठ, गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ह.भप. शंकर महाराज मराठे, सागर महाराज बोराटे, रविदास महाराज शिरसाठ, रविंद्र महाराज गाडेकर, अमृताश्रम स्वामी, केशव महाराज नामदास, भागवत महाराज शिरवळकर, जयवंत महाराज बोधले, शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली.
जयराम बाबा यांचे वारकरी संप्रदायात मोलाचे कार्य आहे. त्यांनी स्थापन केलेल्या सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेतून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी वारकरी शिक्षण घेऊन राज्यासह देशभरात वारकरी संप्रदाय आणि संतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य करत आहेत. विशेष म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे कुटुंब वास्तव्यास असलेले ऐतिहासिक ठिकाण सिद्धबेटाच्या संवर्धनात जयराम बाबा यांचे मोठे योगदान आहे.





