पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) भरतीप्रक्रियांसंदर्भातील माहिती उमेदवारांना सहजरीत्या उपलब्ध व्हावी आणि उमेदवारांच्या मागण्या, प्रश्नांची वेळेत दखल घेता यावी, या हेतूने आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅंडल सुरू करण्यात आले आहे. त्यावरून उमेदवारांना भरतीप्रक्रिया, परीक्षेची त्वरित माहिती उपलब्ध होणे शक्य होणार आहे.
आयोगाच्या कार्यालयाच्या ट्विटर खात्यावरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाची माहिती इत्यादी उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. आयोगाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना उमेदवार तथा अन्य व्यक्तींकडून सामाजिक सभ्यता व संसदीय भाषाशैलीचा वापर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. या ट्विटसद्वारे उमेदवारांच्या प्रतिक्रिया, गाऱ्हाणी यावर आयोगाच्या कार्यालयास वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य होणार नाही. तथापि, प्राप्त होणाऱ्या प्रतिक्रियांचा एकत्रित आढावा घेत आयोगाची भूमिका वेळावेळी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच या प्रतिक्रियांच्या आधारे आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
स्पर्धा परीक्षा केंद्रे, खासगी क्लासेस, उमेदवारांच्या संघटना व उमेदवार यांच्याकडून आयोगाच्या नावाचा, लोगो, ट्विटरचा समाज माध्यमांतून होत असलेला वापर त्वरित बंद करण्यात यावा. अन्यथा, अशा सर्व संबंधितांवर आयोगाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.