MPSC: एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तूर्त ‘होल्ड’वर
MPSC:

विद्यार्थ्यांचे आजचे आंदोलन स्थगित
MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा तूर्तास ऑनलाईन पद्धतीने न घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिधिनींना मंगळवारी दिले. त्यामुळे सध्या ही परीक्षा ऑनलाईन होणार नाही. या आश्वासनानंतर पुण्यात उद्या, बुधवारी होणारे आंदोलन स्थगित केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर विद्यार्थी प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीतील अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली. भविष्यात ऑनलाईन परीक्षा घ्यायची असल्यास, एकाच वेळी सर्व परीक्षा सुरळीत पार पडतील अशी भक्कम यंत्रणा उभी राहिल्यानंतरच विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तसेच, १७ जुलैपर्यंत मुदत असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा गट कच्या अर्जांबाबतही पुनर्विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणावर उद्या मुख्यमंत्री, एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यात बैठक होणार आहे.
या बैठकीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडली. बैठकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अक्षय जैन, किरण निंभोरे, प्रमोद पाटील, लेषपाल जवळगे, शिवराज मोरे, अनिकेत देशमाने, नितीन आंधळे, अर्चना शहा, गणेश उबाळे, निखिल मगर उपस्थित होते.
एमपीएससी अध्यक्ष, सचिवांशी चर्चा करून ऑनलाइन परीक्षा तूर्त लांबणीवर टाकण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. ही विद्यार्थ्यांच्या संघर्षाची पहिली महत्त्वाची पायरी आहे. सरकारने आता विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा आणि अधिकृत निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांमधील संभ्रम कायमचा दूर करावा.
-किरण निंभोरे, विद्यार्थी प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काळानुरूप परीक्षा पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. परंतु, बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.
राजेश पांडे,
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश, भाजपा





