प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या परीक्षा दि. ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. यासंदर्भातील शद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यातील नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी ऐनवेळी दि. २१ डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. त्याच दिवशी एमपीएसीच्या पूर्वपरीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमदेवार संभ्रमात पडले होते. यासंदर्भात एमपीएससीने परीक्षा त्याच दिवशी होणार की पुढे ढकलणार याबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली होती.या सर्व पार्श्वभूमीवर एमपीएससीने आज परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही पूर्व परीक्षा ४ जानेवारी व ११ जानेवारी रोजी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.