मुंबई: राज्यातील नगरपालिका निवडणुकांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट ब आणि गट क परीक्षांच्या तारखांमध्ये केलेल्या बदलामुळे आता मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. आयोगाने २१ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा ४ जानेवारी रोजी घेण्याचे जाहीर केले आहे, मात्र याच दिवशी विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) NET परीक्षाही नियोजित असल्याने हजारो उमेदवारांसमोर ‘कोणती परीक्षा द्यायची?’ असा पेच उभा राहिला आहे. सोमवारी MPSC ने घेतलेल्या या निर्णयानुसार गट ब परीक्षा ४ जानेवारी आणि गट क परीक्षा ११ जानेवारीला होणार आहे. निवडणुकांच्या निकालामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे. परंतु, परीक्षा पुढे ढकलताना आयोगाने UGC NET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेचा विचार न केल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या परीक्षा असल्याने अनेक पात्र उमेदवारांना एका संधीला मुकावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे परीक्षा वेळेवर न होण्यावरून आणि नियोजनातील त्रुटींवरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी तातडीने यात बदल करण्याची मागणी केली आहे.