Nevase News : मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांसाठी खासदार वाकचौरे-आमदार लंघे-पाटील यांचा दिल्ली दौरा; रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट
Nevase News : शेतकऱ्यांचा होत असलेला तीव्र विरोधाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.

नेवासे : शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि नेवाश्याचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी गुरुवारी (दि.६) रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केंद्र सरकारच्या राहुरी – शनिशिंगणापूर या नियोजित रेल्वे मार्गाला राहुरी – शनिशिंगणापूर परिसरातील शेतकऱ्यांचा होत असलेला तीव्र विरोधाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, या भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या रेल्वे मार्गात जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी या नियोजित रेल्वे मार्गाला तीव्र विरोध केल्यामुळे आता आपण या भागातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून हा रेल्वे प्रकल्प रद्द करण्याची एकमुखी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी त्याला पर्याय म्हणून आता ब्रिटिशकालीन बेलापूर – परळी या रेल्वे मार्गाबाबत सविस्तर माहितीही केंद्रीय मंत्र्यांना देत या रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती थेट दिल्ली येथून आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी ‘प्रभात’शी बोलताना दिली. (Nevase News)
राहुरी – शनिशिंगणापूर या नियोजित रेल्वे मार्गाला राहुरी आणि शनिशिंगणापूर परिसरातील शेतकऱ्यांचा होत असलेला तीव्र विरोध लक्षात घेवून काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई मंत्रालयात भेट घेवून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि जिल्ह्यातील काही आमदारांनी भेट घेतली होती. आता गुरुवारी थेट केंद्रीय मंत्र्यांची खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी ही भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा ब्रिटिशकालीन बेलापूर – परळी या रेल्वे प्रकल्पच्या आशा पल्लवीत झालेल्या असून याबाबत रेल्वे मंत्र्यांनी याचा सखोल आढावा घेवून सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार लंघे – पाटील यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या चर्चेत खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करताना स्पष्टपणे सांगितले की, राहुरी – शनिशिंगणापूर हे अंतर अतिशय थोडके असून मोटारीने सुद्धा अल्पवेळेत भाविकांना येथे दर्शनासाठी ये – जा, करणे ही बाब अतिशय सोपी असून या रेल्वे मार्गामुळे जर या परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यास त्यांची मोठी आर्थिक नुकसानही होणार असल्याचे वास्तव केंद्रिय रेल्वे मंत्र्यांपुढे मांडले.
त्या ऐवजी जर ब्रिटिश कालीन बेलापूर – परळी या रखडलेल्या रेल्वे मार्गाला मंजुरी देवून मोठे जंन्क्शन केले तर जिल्ह्यातील दळणवळणाचा मोठा प्रश्न सुद्धा निकाली निघणार असून या प्रकल्पमुळे मोठी प्रगतीही होईल. या रेल्वे मार्गाबाबत सखोल माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी दिलेली असून याबाबत रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला,





