Satara | खासदार साहेब, जागे व्हा , वराती मागून घोडे नको

दहिवडी, (प्रतिनिधी) – गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी माण-खटावसाठी चार दिवसांपूर्वीच सोडण्यात आले आहे. जलसंपदा मंत्र्यांकडे त्याची मागणी आम्ही गेल्याच महिन्यात केली होती. आता पाणी नेर धरणात पोहचत आहे.
तुम्ही थोडे झोपेतून जागे व्हा. प्रसिद्धीसाठी वराती मागून घोडे दामटायचे बंद करा, असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना लगावला.उरमोडी किंवा जिहे-कठापूरचे पाणी खटाव आणि माण तालुक्यांसाठी सोडण्याची मागणी केल्याचे खा. मोहितेंनी सांगितल्यानंतर आ. जयकुमार गोरे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आ. गोरे म्हणाले, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुरेसा पाऊस सुरु असल्याने दुष्काळी खटाव आणि माण तालुक्यांसाठी जिहे-कठापूर योजनेचे पाणी सोडावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून माहिती घेऊन पाणी सोडण्याचे आदेश त्वरित दिले होते.
त्या आदेशाची अंमलबजावणी होवून जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने चार दिवसांपूर्वीच सोडण्यात आले आहे. या योजनेचे पाणी वर्धनगड येथील दाब हरण कुंडापर्यंत पोहचून नेर धरणाकडे झेपावले आहे. थोडा कालावधीसाठी तांत्रिक अडचण आली होती. मात्र, त्यावरही मात करण्यात आली आहे.
ज्यांना पाण्याविषयी तळमळ नाही असे महाभाग हा प्रश्न तेल घालून पेटवायचा नेहमीच प्रयत्न करतात. येरळवाडी तलाव क्षेत्र वनसंवर्धन राखीवमधून वगळण्यासाठी मी मंत्रालयात बैठक आयोजित केली.
वनमंत्री मुनगंटीवार यांनी केंद्राकडे तशी शिफारस करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याच लुंग्या सुंग्यांनी खासदारांना झोपेतून जागे केले. त्यांनी अशा महाभागांच्या नादी लागून प्रसिद्धीचा स्टंट करु नये, असा सल्लाही आ. गोरेंनी दिला.
जिहे-कठापूरचे पाणी गरज असेल तिकडे देणार
आत्ता सोडण्यात आलेले जिहेकठापूर योजनेचे पाणी नेर धरणातून माण तालुक्यातील आंधळी धरणात तसेच खटाव तालुक्यातील येरळा नदीत सोडता येणार आहे.
फेब्रुवारीमध्ये नेर धरणातून आंधळी धरणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळेच दुष्काळात टॅंकर भरता आले होते. आताही माणगंगा नदी प्रवाही करण्यासाठी पाणी नेले जाणार आहे. येरळवाडी धरणात पाणी सोडण्याचेही नियोजन आम्ही करु. दोन्ही तालुक्यात जशी गरज असेल तसे पाणी देण्यात येणार असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले.





