‘4 वेळा आमदार केलं अन् जाताना ताटात घाण करून गेल्या’, नीलम गोऱ्हेंच्या ‘त्या’ आरोपांवर राऊतांचा पलटवार, म्हणाले..

Sanjay Raut on Neelam Gorhe | शिवसेनेमध्ये पदांचे वाटप करण्यासाठी उद्धव ठाकरे हे मर्सिडीज गाड्या घेतात, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला होता. गोऱ्हे यांचे हे आरोप आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहेत. गोऱ्हे यांच्या आरोपानंतर आता शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामध्ये राजकीय वाद पेटला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ठाकरे गटावर आरोप केले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांना मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलवण्यात आले होते. साहित्यक म्हणून त्यांचे काय योगदान आहे?
‘महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी दिल्लीत साहित्य संमेलन भरववले होते का? मराठी साहित्य महामंडळ खंडण्या घेऊन संमेलन भरतात. महामंडळ कार्यक्रम ठरवतात आणि आयोजक सतरंज्या उचलायला असतात.’ अशी जोरदार टीका राऊत यांनी केली आहे.
नीलम गोऱ्हे यांचे कालचे विधान म्हणजे त्यांची विकृती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ही कोणती बाई तुम्ही पक्षात आणली? काही लोकांच्या मर्जीमुळे त्या आल्या अन् गेल्या. 4 वेळा आमदार झाल्या. परंतु जाताना ताटात घाण करुन गेल्या. या बाईचं विधान परिषदेचं कर्तृत्व समजून घ्यायचं असेल तर पुण्याचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या. मग हे मर्सिडिज प्रकरण कळेल., असा जोरदार पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केले नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाहीत. आम्ही दूर झालो, पण तुम्ही अशा प्रकारे विधाने करता. ज्यांनी तुम्हाला आमदार केले, म्हणून तुमचा रुबाब आहे, असे ते म्हणाले.
नीलम गोऱ्हेंनी सांगितलं की मी महामंडळाला 50 लाख दिले. त्यानंतर माझा कार्यक्रम लावला. ते लोकांनी रेकॉर्ड केले आहे. त्या लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे घेतात? प्रश्न विचारण्यासाठी किती पैसे घेतात? माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.





