सांगली (प्रतिनिधी)- भाजप आणि राष्ट्रवादीच्या वरचष्म्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या सावळज (ता . तासगाव) ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी भाजप गटाच्या ९ सदस्यांनी आपल्या सदस्यात्वाचे राजीनामे गुरुवारी सरंपच योगेश पाटील यांच्याकडे सुपूर्त केले . त्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला हादरा बसला आहे .
राजीनामा दिलेल्यांमध्ये सदस्य शिवाजी शिंदे , हेमंत उर्फ अरुण पाटील , काशीनाथ भडके , अमित कांबळे , अभिजीत थोरात , शहाजी बुधवाले , वैशाली कांबळे , पमाताई भिसे , किरण थोरात यांचा समावेश आहे . सावळज ग्रामपंचातीवर खासदार संजय पाटील यांच्या गटाची सत्ता आहे . खासदार पाटील यांच्या गटाचे १४ आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या गटाचे ३ सदस्य असे बलाबल या ग्रामपंचायतीमध्ये आहे.
२०१५ पासून खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचातीमध्ये भाजपची सत्ता आहे. सत्ता भाजपची असलीतरी सरपंच बदलावरुन असलेले अंतर्गत राजकारण आता चव्हाट्यावर आले आहे. याच कारणातून सदस्यांनी राजीनामा दिला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे .
दरम्यान वरील सर्व सदस्यांनी वैयक्तीक कारणासाठी राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे . संजय पाटील यांच्या गटातील ९ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिल्याने मात्र राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत .