खासदार निलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

Ahmednagar : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांचा विजय झाला आहे. निकालाच्या दोन दिवसानंतर आज पारनेरमध्ये लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. राहुल झावरे असे लंके यांच्या समर्थकाचे नाव असून हल्लेखोरांनी झावरे यांच्या कारवर हल्ला केला.
कारच्या काचा फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत झावरे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर पारनेरमध्ये तणावाचं वातावरण असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार झावरे यांच्यावर गुरुवारी दुपारी एक वाजता हल्ला करण्यात आला. झावरे हे पारनेर बसस्थानकाजवळ कारमध्ये असताना काचा फोडून झावरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यानंतर झावरे यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलवलेले आहे. घटनेनंतर पारनेर पोलीस स्टेशन परिसरात मोठी गर्दी झाली आहे.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पारनेर पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्थ तैनात केला आहे. यावेळी पारनेर पोलीस स्टेशनला लंके समर्थक आणि औटी समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी पोलीसांची सुध्दा चांगलीच दमछाक झाली. जुन्या वादातुन पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
अतिशय चुरशीच्या झालेल्या अहमदनगर लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके निवडून आलेत. लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. निलेश लंकेंच्या विजयासाठी अखेर त्यांचे होमग्राउंड असलेल्या पारनेर तालुक्याचे मतदान निर्णायक ठरलेत. आणि निलेश लंके हे विजयी झालेत.
दरम्यान, झावरे यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत कुणावरही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. लोकसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा राजकीय कार्यकर्ते आमने- सामने आल्याने दिसत आहे.





