आता तरुण मुरारी बापूचे वादग्रस्त विधान, म्हणाला… महात्मा गांधी ‘देशद्रोही’

कालीचरण महाराज याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या अतिशय आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रकरण अद्याप मिटलेले नाही. कालीचरणवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असताना आता नरसिंगपूरमध्ये भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू याने महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. जो देशाचे तुकडे करतो, ते राष्ट्रपिता कसे होऊ शकतात? माझा त्यांना विरोध आहे. ते देशद्रोही आहेत. असे वादग्रस्त मुरारी बापूने केले आहे.
मुरारी बापू म्हणाला की, महात्मा गांधी महात्मा नाहीत आणि राष्ट्रपिताही होऊ शकत नाहीत. ते जिवंत असतानाच त्यांनी देशाचे तुकडे केले. म्हणूनच त्यांना देशद्रोही म्हटले पाहीजे. या वादग्रस्त विधानाप्रकरणी नरसिंगपूरमधील स्टेशन गंज पोलिसांनी तरुण मुरारी बापूविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तरुण मुरारी बापू याने सोमवारी छिंदवाडा रोडवरील वीरा लॉन येथे श्रीमद भागवत कथेदरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
तरुण मुरारी बापूच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना कॉंग्रेसकडून निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भादंवि कलम १५३, ५०४, ५०५ अन्वये गंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तरुण मुरारी बापू अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे.





