स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ जारी
इंदूर : मध्यप्रदेशात राजकीय उलथापालथी सुरू झाल्या असतानाच कथित स्टिंग ऑपरेशनचा एक व्हिडीओ पुढे आला आहे. त्या व्हिडीओतून कमल नाथ सरकार पाडण्यासाठी कॉंग्रेसच्या काही आमदारांना प्रत्येकी तब्बल 100 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेशात प्रचंड खळबळ उडवून देणारा व्यापमं घोटाळा उघडकीस आणणाऱ्या डॉ.आनंद राय यांनी स्टिंग ऑपरेशनबाबतचा व्हिडीओ जारी केला आहे. काही महिन्यांपूर्वी राय यांची दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा यांच्याशी भेट झाली. त्या भेटीत माझे परिचित असणाऱ्या कॉंग्रेसच्या 4 आमदारांना चार टप्प्यांत रक्कम देण्याचा आणि मंत्रिपदी वर्णी लावण्याचा प्रस्ताव देण्यात आला.
भाजप नेतृत्वाच्या निर्देशावरून मिश्रा यांनी माझी भेट घेतली, असा दावाही राय यांनी केला. मात्र, राय यांचा व्हिडीओ बनावट असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे. तर, कुठल्याही यंत्रणेने व्हिडीओच्या सत्यतेची पडताळणी करावी, असे आव्हान राय यांनी दिले आहे.