हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची पकड अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. शिक्षण संस्थांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतात, यावर लक्ष ठेवण्यासाठी आता वर्गातच टेहळणी कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी प्रस्थापित प्रशसनाच्या समर्थक काही लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे.
हॉंगकॉंगमधील एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सल्लागार आणि चीफ एक्झिक्युटिव्ह कॅरी लॅम यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्य टॉमी च्युयांग यु-यान यांनी याबाबतची सूचना मांडली आहे. वर्गात सीसीटिव्ही कॅमेरे लावल्यावर शिक्षकांवर लक्ष ठेवले जाऊ शकेल. शिक्षक विद्यार्थ्यांना बंडखोरीला उद्युक्त करत आहेत का, हे यातून समजू शकेल. या कॅमेऱ्याद्वारे शिक्षकांचे बोलणेही रेकॉर्ड केले जाऊ शकेल.
तसेच कोणा निरपराध व्यक्तीवर कारवाई होत असेल, तर यामुळे तो धोकाही टाळला जाऊ शकेल. 2019 मध्ये हॉंगकॉंगमध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक असंतोष उफाळून आला होता. त्या पार्श्वभुमीवर शिक्षण क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचे हॉंगकॉंग प्रशासनाने ठरवले आहे. लोकशाहीवादी मागण्या आणि सुरक्षेबाबत हुकुमशाहीच्या कायद्याला विरोधासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. म्हण्नून हॉंगकॉंग प्रशासनाने शिक्षकांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घ्यायचा विचार सुरू केला आहे.