तळेगाव दाभाडे, दि.24 (वार्ताहर) करोना काळात बंद केलेली लोकल रेल्वे सेवा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी लोक कल्याण कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि.24) सकाळी तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात आले.
मावळ तालुक्यातील हजारो विद्यार्थी, कामगार, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, व्यापारी व नागरिकांना दैनंदिन लोणावळा पुणे लोकल फायदेशीर ठरत आहे. मात्र करोनाकाळात लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, व्यापारी व नागरिकांची गैरसोय होत आहे. वारंवार रेल्वे प्रशासनाकडे लोकल रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. दुपारच्या वेळी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, व्यापारी, दुग्ध व्यावसायिक व कामगार यांना तासनतास लोकल रेल्वे ची प्रतीक्षा करावी लागत आहे. दुपारच्या वेळेतील लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी लोक कल्याण कृती समितीच्या वतीने रेल्वे सेवा पूर्ववत करण्याच्या घोषणा देत लोकल रेल्वे रोको करुन रेल्वे स्टेशन व्यवस्थापक प्रशांत लंका यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी योगेश सोमवंशी, प्रदीप भुजबळ, बाळासाहेब जोगदंड, मलिक कांबळे, संदीप हेरोडे, अतुल वाघ, महादेव शेलार, रमेश गायकवाड, शरद शेळके, अजित माले, राजेश गडकरी व बहुसंख्येने प्रवासी उपस्थित होते.