- काश्मिरी विद्यार्थ्यांना ज्ञानदानासाठी “नेशन फर्स्ट’ उपक्रम
- लष्कराच्या 5 गुडविल स्कूल्सला करणार मदत
पुणे – इंद्राणी बालन फाउंडेशन-भारतीय लष्कर यांच्यात सामंजस्य करारयुवा उद्योजक, चित्रपट निर्माते पुनीत बालन यांच्या इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे “नेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत आता काश्मिरी विद्यार्थ्यांना ज्ञानदानासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. फाउंडेशनच्या वतीने काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या 5 गुडविल शाळांना मदत करण्यात येणार आहे.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स मुख्यालय येथे फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन आणि चिनार कॉर्प्स मुख्यालयाचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी नुकत्याच या संबंधीच्या करारावर स्वाक्षाऱ्या केल्या. याप्रसंगी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल उपस्थित होत्या. या करारांतर्गत इंद्राणी बालन फाउंडेशन उरी, वायन, तरेहगाम आणि हाजीनार या ठिकाणच्या गुडविल स्कूल्सला, तसेच बारामुल्ला येथे विशेष मुलांसाठी असलेल्या परिवार स्कूलला तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक मदत करणार आहे.
याप्रसंगी चिनार कॉर्प्स मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू म्हणाले, काश्मीरसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय लष्कराच्या वतीने जम्मू-काश्मीरमध्ये 44 गुडविल स्कूल्स चालवण्यात येतात, यातील 28 शाळा काश्मीर खोऱ्यात आहेत. या शाळांमधून एक लाखाहून अधिक स्थानिक विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. तर, सध्या 10 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशाच्या इतर भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच या मुलांना शिक्षण देण्याचा आमचा हेतू आहे.
“इंद्राणी बालन फाउंडेशन’चा “नेशन फर्स्ट’ हा प्रभावी उपक्रम सुरू करतांना मला खूप आनंद होत आहे. गेले काही वर्षे आम्ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहोत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. काश्मीर हा देशाचा अभिमानाचा परंतु संवेदनशील असा भाग आहे. त्यामुळे तिथल्या काश्मिरी मुलांच्या भविष्यासाठी आपलेही योगदान असावे, असे आम्हाला वाटते. काश्मिरी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा त्यांचा अधिकार आहे. काश्मीर खोऱ्याच्या विकासासाठी केलेली ही फक्त सुरुवात आहे, पुढे अजूनही काही प्रभावी उपक्रम आम्ही तिकडे राबविणार आहोत.’
– पुनीत बालन, अध्यक्ष, इंद्राणी बालन फाउंडेशन