Insurance Rules : 15 डिसेंबरपासून वाहन विम्याचे नियम बदलणार! थर्ड पार्टी, अपघात विमा अन् ओन डॅमेजसाठी स्वतंत्र पर्याय
Insurance Rules : कार आणि दुचाकी विमा चार विभागांत; कोणता विमा आवश्यक आणि कोणता ऐच्छिक, हे ग्राहकांना ठरवता येणार

Insurance Rules : कार किंवा दुचाकीचा विमा काढताना आता वाहनधारकांना अधिक पर्याय मिळणार आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) खासगी कार आणि दुचाकी विम्यासाठी चार विभागांची नवी रचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा बदल १५ डिसेंबर २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना कोणते विमा संरक्षण घ्यायचे, हे स्पष्टपणे निवडता येईल. तसेच प्रत्येक विमा संरक्षणासाठी किती प्रीमियम भरावा लागणार आहे, याची माहितीही स्वतंत्रपणे मिळणार आहे.
IRDAI ने २ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार थर्ड पार्टी विमा आणि वाहनमालकाचा वैयक्तिक अपघात विमा आवश्यक राहणार आहे. तर प्रवाशांचे संरक्षण आणि स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीचा विमा ऐच्छिक असेल.
विम्याचे चार विभाग कोणते?
१. थर्ड पार्टी विमा (अनिवार्य)
वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तीला दुखापत झाली, मृत्यू झाला किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तर वाहनमालकावर कायदेशीर जबाबदारी येऊ शकते. अशा वेळी या विम्याचा उपयोग होतो. मोटार वाहन कायद्यानुसार हा विमा घेणे बंधनकारक आहे.
२. प्रवाशांसाठी कायदेशीर जबाबदारीचा विमा (ऐच्छिक)
कारमधील प्रवासी किंवा दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तीला अपघातात दुखापत झाल्यास वाहनमालकाची कायदेशीर जबाबदारी निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत हा विमा उपयोगी ठरतो. वाहनमालकाच्या कर्मचाऱ्यांनाही या संरक्षणात समाविष्ट करता येईल. हा विमा ऐच्छिक असून त्यासाठी स्वतंत्र प्रीमियम भरावा लागेल.
३. वैयक्तिक अपघात विमा (काहींसाठी अनिवार्य)
या विभागात दोन प्रकारचे संरक्षण असेल. विमा काढणाऱ्या वाहनमालकासाठी वैयक्तिक अपघात विमा अनिवार्य असेल. मात्र कारमधील इतर प्रवासी, दुचाकीवरील मागे बसणारी व्यक्ती आणि वाहनमालकाव्यतिरिक्त इतर चालकांसाठी अतिरिक्त अपघात विमा घेणे ऐच्छिक असेल.
४. स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीचा विमा (ओन डॅमेज)
अपघात, आग किंवा विमा पॉलिसीत समाविष्ट असलेल्या इतर कारणांमुळे स्वतःच्या वाहनाचे नुकसान झाल्यास या विम्याचा उपयोग होतो. वाहन चोरीला गेल्यासही पॉलिसीच्या अटींनुसार संरक्षण मिळू शकते. हा विमा ऐच्छिक असेल.
विमा निवडण्यासाठी पर्याय फॉर्म भरावा लागणार –
नव्या नियमानुसार विमा कंपन्यांना ग्राहकांना स्वतंत्र पर्याय फॉर्म द्यावा लागेल. त्यामध्ये विम्याचे चारही विभाग आणि त्यांचे संरक्षण स्पष्ट केलेले असेल. ग्राहकाला हवा असलेला विमा निवडण्यासाठी संबंधित पर्यायासमोर खूण करावी लागेल.
ही प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी करता येईल. ग्राहकाने भरलेला पर्याय फॉर्म विमा पॉलिसीचा भाग असेल. तसेच विमा खरेदी करताना कंपन्यांना ग्राहकांना ‘कस्टमर इन्फॉर्मेशन शीट’ (CIS) देणेही बंधनकारक असेल.
प्रत्येक विम्यासाठी किती पैसे भरावे लागतील?
नव्या नियमानुसार विमा पॉलिसीमध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रीमियम दाखवावा लागेल. म्हणजेच थर्ड पार्टी विमा, प्रवाशांचे संरक्षण, वैयक्तिक अपघात विमा आणि ओन डॅमेज यांसाठी किती पैसे आकारले आहेत, हे ग्राहकाला समजेल.
त्यामुळे कोणत्या संरक्षणासाठी किती खर्च होत आहे, याची माहिती मिळेल. ग्राहकाला आपल्या गरजेनुसार विम्याची निवड करता येईल.
जुनी पॉलिसी असलेल्यांनाही अतिरिक्त संरक्षणाची संधी –
ज्या वाहनधारकांकडे आधीपासून थर्ड पार्टी विमा आहे, त्यांनाही पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी दुसऱ्या विभागातील म्हणजेच प्रवाशांच्या कायदेशीर जबाबदारीचे संरक्षण जोडता येईल. त्यासाठी अतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल.
मात्र हे अतिरिक्त संरक्षण सध्याची थर्ड पार्टी पॉलिसी ज्या विमा कंपनीने दिली आहे, त्याच कंपनीकडून घ्यावे लागेल. त्यासाठी जुनी थर्ड पार्टी पॉलिसी रद्द करण्याची गरज नाही. विमा कंपनीने दिलेल्या एंडोर्समेंटमध्ये नमूद केलेल्या तारीख आणि वेळेपासून हे संरक्षण सुरू होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय –
‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध श्रीमती थुंगला धनलक्ष्मी व इतर’ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार हा बदल करण्यात आला आहे. वाहनधारकांना विम्यातील विविध पर्याय स्पष्टपणे समजावेत आणि त्यांना योग्य विमा संरक्षण निवडता यावे, हा यामागील उद्देश आहे.
१५ डिसेंबरपासून नवी रचना लागू –
IRDAI चे हे नियम १५ डिसेंबर २०२६ पासून जारी होणाऱ्या खासगी कार आणि दुचाकी विमा पॉलिसींना लागू होतील. सर्वसाधारण विमा कंपन्यांना चार विभागांची रचना, एकसमान पॉलिसी अटी आणि पर्याय फॉर्म लागू करावा लागेल. तसेच नव्या पद्धतीच्या पॉलिसी बीमा सुगम या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहनधारकांनी काय लक्षात ठेवावे?
थर्ड पार्टी विमा आणि वाहनमालकाचा वैयक्तिक अपघात विमा आवश्यक आहे. प्रवाशांचे संरक्षण आणि स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीचा विमा ऐच्छिक आहे. त्यामुळे केवळ कमी प्रीमियम पाहून विमा निवडण्याऐवजी आपल्या वाहनाचा वापर, प्रवास आणि आर्थिक गरज लक्षात घेऊन संरक्षण निवडणे महत्त्वाचे ठरणार आहे.





