Kangana Ranaut: ‘भारत भाग्य विधाता’चा मोशन पोस्टर रिलीज; २६/११ हल्ल्यात जीव धोक्यात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलाम
Kangana Ranaut कंगना रनौतने सांगितले की, हा चित्रपट कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता इतरांसाठी पुढे येणाऱ्या लोकांना समर्पित आहे. “संकटाच्या वेळी माणुसकीच सर्वात मोठी ताकद ठरते,” असे ती म्हणाली. रुग्णांची सेवा करणारे कर्मचारी हेच खरे हिरो असल्याचेही तिने सांगितले.

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौतच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाचा नवा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा पोस्टर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी रुग्णालयात काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या धैर्याला सलाम करणारा आहे. पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘द अनसीन हिरोज’ या संकल्पनेवर आधारित या पोस्टरमध्ये नर्स, वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, लिफ्ट ऑपरेटर आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांची झलक दाखवण्यात आली आहे. संकटाच्या वेळी या लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले होते. या सामान्य पण धाडसी लोकांची कहाणी या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.
कंगना रनौतने सांगितले की, हा चित्रपट कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता इतरांसाठी पुढे येणाऱ्या लोकांना समर्पित आहे. “संकटाच्या वेळी माणुसकीच सर्वात मोठी ताकद ठरते,” असे ती म्हणाली. रुग्णांची सेवा करणारे कर्मचारी हेच खरे हिरो असल्याचेही तिने सांगितले.
View this post on Instagram
चित्रपटाचे निर्माते जयंतीलाल गडा यांनी सांगितले की, भारताची खरी ओळख म्हणजे संवेदनशीलता आणि एकमेकांबद्दलची आपुलकी. हा चित्रपट लोकांना त्या काळातील सत्य घटनांची आठवण करून देईल, असे त्यांनी म्हटले आहे.
चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक मनोज तापडिया यांनी सांगितले की, पडद्यावर हिंसा दाखवणे सोपे असते, पण शांतपणे आणि निस्वार्थपणे काम करणाऱ्या लोकांचे धैर्य दाखवणे कठीण असते. या चित्रपटातून अशाच लोकांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली आहे.
‘भारत भाग्य विधाता’मध्ये कंगना रनौतसोबत गिरिजा ओक, स्मिता तांबे, अमृता नामदेव, ईशा डे, प्रिया बेर्डे, आशा शेलार, सुहिता थत्ते, रसिका आघासे, आदित्य मिश्रा आणि जाहिद खान हे कलाकार दिसणार आहेत.
हा चित्रपट १२ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.





