प्रभात वृत्तसेवा वाल्हे – आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे बिबट्याने पाळीव कुत्र्यांच्या सहा पिल्लावर हल्ला केला; मात्र, कुत्र्याने आपल्या सहा पिल्लांच्या रक्षणासाठी पिल्लांच्या आईने हल्ला केला.यादरम्यान बिबट्याने पिल्लांना सोडून पिल्लांच्या आईला घेऊन पोबारा केला. आडाचीवाडी येथील शेतकरी अरविंद जंगल पवार यांच्या घराबाहेर मध्यरात्री बिबट्या अवतरला. दरम्यान, बिबट्याने, कुत्र्याला घेऊन पोबारा केला.हे पाहून पवार कुटुंबीयांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. मंगळवारी नेहमीप्रमाणे जनावरे, शेळ्या गोठ्यात बांधल्यानंतर शेजारी घरात झोपलेल्या अरविंद पवार यांना मध्यरात्री दोनच्या दरम्यान कुत्र्याचा जोरात भुंकण्याचा आवाज आला. जाग आल्यानंतर पवार यांनी त्यांचा मुलगा ओंकारसह घराबाहेर धाव घेतली असता बिबट्या व त्यांचा पाळीव कुत्रा यांची झटापट सुरू झाल्याचे त्यांनी पाहिले. यावर त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या आवाजाने बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लांना जागेवर सोडून पाळीव कुत्र्याला घेऊन पोबारा केला. दरम्यान, पवार यांनी बॅटरीने आजूबाजूला पाहिले असता अंधारामध्ये बिबट्या पळून जात असल्याचे त्यांना दिसला असल्याचे ओंकार पवार यांनी सांगितले. हल्ले वाढले.. आडाचीवाडी परिसरात मागील दोन दिवसापूर्वीच विनयकुमार पवार यांच्या पोल्ट्रीवरील पाळीव कुञ्यांवर हल्ला करून शेजारील चिंचेच्या झाडावर चढून बिबट्याने शिकार खाल्ली होती. दरम्यान, बिबट्या मागील काही दिवसांपासून मनुष्यवस्तीत येऊन पाळीव जनावरांवर हल्ला चढवत असून यामुळे परिसरात नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. परिसरात सलग हल्ले होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती वाढली असून प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.